मुंबई/प्रतिनिधी दि. ८ :- महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान मुंबई पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.
आदरणीय शरद पवारसाहेबांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. काल न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवारसाहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.
आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली आहे.