कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर येथील निवासस्थानी आज दुपारी अचानक एसटी कर्मचारी धडकले आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराच्या दिशेने चप्पल फेक केली. तसंच शिमगा केला. अचानक झालेल्या आंदोलनाने सुरक्षेचा बोजवाराचा उडाल्याचं समोर आलं. आता या घटनेवर उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार खवळले आहेत. अजित पवार यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या वयातही विविध घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीने काम करत आहेत. देशाचे आणि राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आजही गरज पडल्यास ते पंतप्रधान मोदी यांची ही भेट घेतात. एसटी कामगारांच्या प्रश्नाकडे शरद पवारांनी सहानुभूतीने पाहिले होते. त्यांच्या मागण्या सोडण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले होते. न्यायालयाने दिलेला निर्णय राज्य सरकारने मान्य ही केला होता. तसेच कामगारांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पेढे वाटून आणि गुलाल उधळून जल्लोष केला होता. असे असताना दुसरीकडे शरद पवारांच्या घरावर हल्ला होतो. अशा घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चालू देणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला
उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारास आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या हल्ल्याचा मास्टर माईंड कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. आंदोलनात चिथावणीखोर भाषणे कुणी दिली हेही पाहिले पाहिजे. पवारांच्या घरावर मोर्चा निघणार आहे याची माहिती मिळाली नाही हे पोलिसांचे अपयश आहे, अशी कबुलीही अजित पवार यांनी दिली