कोल्हापूर/प्रतिनिधी २५: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त “लोकराजा कृतज्ञता पर्व” अंतर्गत आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनास आज यशस्विनी राजे छत्रपती यांनी भेट दिली. हे छायाचित्र प्रदर्शन पाहून भारावून गेलेल्या यशस्विनी राजे म्हणाल्या, कोल्हापूरच्या तरुण पिढीने हे प्रदर्शन पाहून समजून घेतले तर शाहूंचे विचार आणि कार्य समजून घेता येईल.
छत्रपती घराण्याचा वंशवृक्ष आणि आपल्या पूर्वजांच्या प्रतिमा, त्याखालील मजकूर काळजीपूर्वक वाचत अनेक दुर्मिळ छायाचित्रांबाबत त्यांनी चिकित्सक चर्चा केली. शाहू महाराजांच्या आई, आजी , पणजी यांच्या छायाचित्रांसह अनेक दुर्मिळ छायाचित्रांची त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये छायाचित्रे घेतली.
शाहू मिलच्या पायाभरणीच्या दगडावरील मजकूर, छायाचित्रांचे ठिकाण, व्यक्ती, विविध आदेशातील मजकूर त्यांनी अभ्यासपूर्वक समजून घेतला.
यावेळी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध श्रीमती दुर्गुळे आजींची आस्थेने विचारपूस केली. “गंगावेशीत आम्हाला राजाराम महाराजांनी जागा दिली, घर दिले,” असे या आजींनी सांगितले. यशस्विनीराजे या मालोजी राजेंच्या कन्या आहेत, असल्याचे समजल्यावर आजी आनंदाने भारावून गेल्या.एकाच वेळी शंभर हून अधिक चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे उपस्थित बारकाईने पाहत असल्याचे दिसून आले.
खाद्य महोत्सव आयोजित केलेल्या बचत गटाच्या महिलांशी विचारपूस करत त्यांच्या पदार्थांची चव त्यांनी चाखली. यावेळी प्रमोद पाटील, ऋषिकेश केसकर, उदय गायकवाड, आदित्य बेडेकर आदी उपस्थित होते.