कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अक्षय्य तृतीया, करवीरनिवासिनी जगदंबेचा दोलोत्सव. अर्थातच जगदंबा रजत सिंहासनाधिष्ठित झोपाळ्यावर आरूढ होऊन अगदी गौरी प्रमाणे झोके घेते. माध्यान्ह काळ आणि सुर्यास्ताच्या पुर्वसमयी चोपदारांच्या ललकारीने, हवालदार, रोशनाईक व इतर मानकऱ्यांसोबत, सनई-ताशा अशा मंगल वाद्यांसह जगदंबेची उत्सवमूर्ती गर्भगृहातुन गरुड मंडपाकडे प्रस्थान ठेवते. गरुड मंडपामध्ये रजत सिंहासनाधिष्ठित हिंदोळ्यावर विराजमान झाल्यानंतर उत्सवमूर्तीची विविध वस्त्र-अलंकारयुक्त अलंकार पुजा बांधली जाते. सोबत चौऱ्या, मोर्चेल, अब्दागिरी सुध्दा विराजमान होतात. विविध पाना-फुलांनी झोपाळा आणि गरुड मंडप सजवला जातो, आणि चोपदारांच्या ललकारीने चालु होतो जगदंबेचा दोलोत्सव. चोपदार देवीला अखंड झोके देत असतात. करवीरातील सुहासिनी जगदंबेला हळद-कुंकू व इतर सौभाग्य अलंकार प्रदान करण्यासाठी गरुड मंडपामध्ये आवर्जुन हजेरी लावतात. कैरीचे पन्हे आणि आंबेडाळ सर्वांना देण्याची रेलचेल चालु असते. रात्री ८:०० च्या सुमारास उत्सवमूर्ती चोपदारांच्या ललकारीने गर्भगृहाकडे प्रस्थान ठेवते.नंतर नेहमीप्रमाणे शेजारती होते.आणि अशा रीतीने जगदंबेचा दोलोत्सव संपन्न होतो परंतु जगदंबा आपल्या भक्तांच्या भावविश्वातील हिंदोळ्यावर अखंड विराजमान होते.
करवीर निवासिनी अंबाबाईचा दोलोत्सव….

Read Time:2 Minute, 6 Second