Media Control Online
विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला हादरे बसू लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. अवघ्या दोन आठवड्यांमध्ये भाजपनं मविआला दोन मोठे दणके दिले आहेत. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे तब्बल १३ आमदार नॉट रिचेबल आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार असलेले चंद्रकांत हंडोरे काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. या पराभवाची जबाबदारी मी घेतो, असं थोरात काल म्हणाले होते. आता थोरात काँग्रेसच्या गटनेतेपदावरून पायउतार होण्याच्या मनस्थितीत असल्याचं समजतं.