Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा ६ टक्के सवलत योजनेमधून दोन दिवसात ६ कोटी ८२ लाख २४ हजार १० रुपये महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र व ऑनलाईन जमा झाले आहेत. शहरातील चालू वर्षाचा मिळकत कर एक रकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना गुरुवार, दि.30 जून २०२२ अखेर ६ टक्के सवलत दिली आहे. या योजनेला नागरीकांनी प्रतीसाद देत बुधवार अखेर ४१३३४ करदात्यांनी एकूण रु.२४ कोटी ४ लाख ५० हजार ११० इतकी रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे. तर मंगळवार व बुधवार अशा दोन दिवसात ६ कोटी ८२ लाख २४ हजार १० रुपये जमा झाले आहेत. बुधवारी एका दिवसात २ कोटी १२ लाख ३७ हजार १२८ रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. यामध्ये ऑनलाईन ७० लाख रुपये जमा झाले आहेत. गुरुवार दि.३० जून २०२२ रोजी या सलवत योजनेचा शेवटचा दिवस आहे. यासाठी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सायंकाळी ७.०० पर्यंत सुरु राहणार आहेत. ३० जून नंतर १ जुलै ते ३० सप्टेंबर अखेर करदात्यांना ४ टक्के सवलत दिली जाणार आहे. तर १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०२२ अखेर २ टक्के सवलत दिली जाणार आहे. तरी ६ टक्के सलवत योजनेचा जास्तीत जास्त करदात्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे