कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : आठ दिवसांपासून संततधार सुरु असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी पासून राजाराम बंधार्यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे जात आहे आज दुपारी १ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.९ फुटांवर (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे) पोहोचली. जिल्ह्यातील एकुण ६४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने. आजूबाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारी सायंकाळी राजाराम बंधार्यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे वेगाने झेपावत असल्याने खबरदारी म्हणून प्रयाग चिखली व आंबेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी पहाटेपासूनच बाडबिस्तारा आवरायला सुरुवात केली. दिवसभरात सुमारे ४० ते ५० टक्के ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून प्रयाग चिखलीच्या बहुतांश ग्रामस्थांनी पुनर्वसन झालेल्या सोनतळी ठिकाणी आसरा घेतला आहे.
गुरुवारी रात्रीपर्यंत चिखलीतील सुमारे अडीच ते तीन हजार तर आंबेवाडीतील ८०० ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये आले असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार संभाव्य पूरबाधित परिसराची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हेलिपॅडसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, स्थानिक रेस्क्यू फोर्ससह संबंधितांना सज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन परिस्थिती- कोल्हापूर जिल्हा प्रशासना नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक
०२३१-२६५९२३२
०२३१-२६५२९५०
०२३१-२६५२९५३
०२३१-२६५२९५४
टोल फ्री क्र. १०७७