कोल्हापूर प्रतिनिधी मार्था भोसले
इचलकरंजी : आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे वंचितांचे आणि बहुजनांचे लढवये नेतृत्व आहे. इचलकरंजीत त्यांना मिळालेला समाज गौरव पुरस्कार म्हणजे पुरोगामी विचारांना बळकटी देणारा सत्कार आहे, असे गौरवउद्गार समाजवादी प्रबोधिनीचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी काढले.हसन मुश्रीफ यांच्यासारख्या बहुजनांच्या नेतृत्वाला जनतेने जीवापाड जपण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. इचलकरंजी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्यावतीने आमदार हसन मुश्रीफ यांना समाज गौरव पुरस्कार देण्यात आला. येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद कुलकर्णी होते.भाषणात प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,राजकारण व समाजकारण शंभर टक्के एकत्र आल्यावर लोकनेते हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेतृत्व तयार होते.
सत्काराला उत्तर देताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून दिनदलित, वंचित आणि अस्पृश्यांच्या व्यथा आणि वेदनांचे वर्णन केले. अवघे दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ यांच्या साहित्यावर हजारो लोक संशोधन करीत आहेत. दलित, पीडित वर्गाच्या मदतीला धावून जाऊन त्यांची सेवा करा. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा, हीच अण्णाभाऊ साठे यांना खरे अभिवादन ठरेल, असेही ते म्हणाले.
माजी आमदार राजू आवळे म्हणाले, आमदार हसन मुश्रीफांनी समाजातील तळागाळातील जनतेला आपलंस केले आहे. त्यातूनच त्यांची गोरगरिबांचे कैवारी ही प्रतिमा तयार झालेली आहे. ज्याप्रमाणे महापुरुष कधी जातीच्या चौकटीत बसू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी आपल्या कामालाही कधी जातीची चौकट घातली नाही. कार्यक्रमात वेटलिफ्टर निकिता कमलाकर, श्रद्धा अकॅडमीचे आप्पासाहेब तांबे यांच्यासह, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट पदाधिकारी, असंघटित बांधकाम कामगार व गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन जांभळे, कोजिमाशी पतसंस्थेचे अध्यक्ष यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवराज चुरमुंगे, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, राहुल खंजिरे, अमित गाताडे आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, अस्वस्थ वर्तमानकाळात महापुरुषांकडून आम्ही काय घेणार आहोत, हे महत्त्वाचे आहे. गेल्या दशकभरात महामानवांनाच हायजॅक करण्याचे राजकारण सुरू आहे. सत्तेविरोधात बोलले की देशद्रोही म्हणून गुन्हे दाखल होत आहेत. लोकशाहीचे नाव घेऊन पद्धतशीर हुकूमशाही सुरू आहे. धर्मनिरपेक्षतेची बाब लांबच राहिली, धर्मराष्ट्राची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व, या एकाच मौलिक गोष्टीची गरज आहे.