विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. या वेळी संजय मंडलिक यांना उद्देशून शिवसैनिकांनी गद्दार खासदार अशा घोषणा दिल्या. तसेच, संजय मंडलिक यांचा बेंटेक्स घातलेले फोटोही झळकावण्यात आले. शिवसेनेशी गद्दारी केल्याबद्दल मोर्चाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी मंडलिक यांना जाब विचारण्यात आला.
शिवसैनिकांनी संजय मंडलिक यांच्या विरोधात मोर्चा काढून त्यांना त्यांच्या विधानाची आठवण करुन दिली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांनी जेव्हा बंड केले तेव्हा, कोल्हापूरात मोर्चा काढणारे संजय मंडलिक हे पहिलेच खासदार होते. या मोर्चात भाषण करताना आक्रमक होत संजय मंडलिक यांनी म्हटले होते का, गेले ते बेंटेक्स राहील ते २४कॅरेट सोने. मंडलिक यांनी हे विधान केले खरे. पण, हे विधान करुन अवघे काही तास उलटायच्या आधीच त्यांनी शिंदे गाटत पलायन केले. त्यामुळे कोल्हापूर आणि शिवसेनेमध्ये चांगलीच नाराजी आहे
शिवसैनिकांनी काढलेल्या आजच्या मोर्चात संजय मंडलिक यांना याबद्दलच जाब विचारण्यात आला. शिवाय गद्दार खासदार म्हणत बेंटेक्स खासदार असे फलकही मोर्चात झळकाविण्यात आले आहेत. संजय मंडलिक यांनी घडलेली चूक वेळीच दुरुस्त करावी. अन्यथा येत्या निवडणुकीत त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचेही शिवसैनिकांनी म्हटले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेला चांगलाच फटका बसला आहे. कोल्हापूरातील शिवसेनेचे सगळेच आमदार शिंदे गटात गेले आहे. त्यासोबतच खासदारांचाही समावेश आहे. आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर तसेच संजय मंडलिक आणि धैर्यशील माने अशी या आमदार खासदारांची नावे आहेत.