Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वीकारणार असल्याचे सूतोवाच खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. मात्र, वक्तव्य करून ‘यू टर्न’ घेण्याची परंपरा असणारे पाटील आता कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांची आता खऱ्या अर्थाने ‘घरवापसी’ होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपच्या नेतृत्वाने विधानसभेच्या गेल्या निवडणुकांमध्ये पाटील यांना ऐन वेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. लोकसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपला एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांना फटका बसला आणि कोथरूडचे मताधिक्य २५ हजारांपर्यंत खाली आले. त्यानंतर गेल्या अडीच वर्षांत पाटील यांनी मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून पकड मिळवली.
नुकत्याच झालेल्या सत्तांतरनंतर पहिल्या टप्प्यातच मंत्रिमंडळात पाटील यांना स्थान देण्यात आले. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रिपदी त्यांचीच वर्णी लागेल, अशी अटकळ होती. नुकत्याच शिरूर येथे झालेल्या खासगी कार्यक्रमात फडणवीस पुण्याचे पालकमंत्री असतील, असे सूतोवाच पाटील यांनी केले होते. फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, आता पाटील पुन्हा कोल्हापूरची जबाबदारी सांभाळणार असून, तेथे विस्कटलेली घडी बसविण्यासाठी ते प्रयत्नशील असतील, अशी भाजपमध्ये चर्चा आहे.