कोल्हापुरात पावसाची विश्रांती, पण नदीच्या पाणी पात्रात वाढ सुरूच…

कोल्हापूर, पुष्पा पाटील  : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने नद्यांच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी कालच पात्राबाहेर पडले आहे. आज सकाळपासून पावसाने आपला जोर कमी केला असला तरी नदीच्या पाणी पात्रात वाढ सुरूच आहे. सध्या जिल्ह्यातील 58 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे विविध घटना घडलेले आहेत, त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील पोहडे गावात चंद्रकांत पाटील यांच्या घराच्या मागे दरड कोसळली असून घरातील सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

तसेच चंदगड तालुक्यातील बेडशी गावातील मुख्य रस्त्याचा भाग खचला असून तो रस्ता धोकादायक बनला आहे. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले असून रस्त्याची वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आलेली आहे. सध्या कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 32 फुटांवर पोहोचलेली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुटांवर आहे, जर पावसाचा जोर वाढला तर येत्या दोन दिवसात पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडेल असा अंदाज आहे. सध्या कोल्हापुरात पावसाने विश्रांती घेतल्याने नदीकाठच्या गावातील लोकांनी सुटकेचा विश्वास सोडला असल्याचे दिसून येते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *