Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे आज सायंकाळी ५ वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या २२ बोगीमधून १ हजार ६६ मजूर आपापल्या गावी मार्गस्थ झाले.
मध्यप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांमधील मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून जलबपूरकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या बस तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या महाविद्यालयीन विद्यार्थी वाहतूक बसमधून विविध तालुक्यात असणाऱ्या मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली.
थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दाखविलेल्या हिरव्या झेंड्यानंतर जिल्ह्यातील ही पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशकडे रवाना झाली. टाळ्यांच्या गजरात या कामगारांची रवानगी करण्यात आली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे आदी यावेळी उपस्थित होते
२२ बोगीमधून १ हजार ६६ कामगार
करवीरमधील ३६२, इचलकरंजीमधील ९६ , शिरोळमधून ११२, गगनबावडामधील १३,हातकणंगलेमधून ३८८, शाहूवाडीमधील ८, कोल्हापूर शहरातील १३,पन्हाळामधील ५९, कागलमधील १५ असे एकूण १ हजार ६६ कामगार रेल्वेच्या २२ बोगीमधून आपापल्या गावी आज रवाना झाले.
पालकमंत्र्यांकडून फूड पॅकेट, पाणी बॉटलची सोय
मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे रवाना झालेल्या कामगारांना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रवाशाला फूड पॅकेट, पाणी बॉटल देण्यात आली. त्याचबरोबर उद्या सकाळसाठी बिस्कीटे, फरसाण, चिरमुरे याचेही वाटप करण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांकडूनही निरोप
जयसिंगपूर,शिरोळ, इचलकरंजी परिसरातून मध्यप्रदेशला जाणाऱ्या मजुरांसाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजच्यावतीने बस सेवा दिली. या सर्व मजुरांना उपस्थित राहून त्यांनी आज निरोप दिला.