गांधीनगर बाजारपेठेत एकच गर्दी , दुकाने सुरू : सोशल डिस्टन्सचा फज्जा

विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर चाळीस दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी सकाळी सात वाजता गांधीनगर बाजारपेठ सुरू झाली आणि बघता बघता ग्राहकांची एकच गर्दी झाली. वाहने आणि ग्राहकांनी रस्ते फुलून गेले. बऱ्याच दिवसांपासून विसावलेल्या आर्थिक चक्राने पुन्हा एकदा उभारी घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, ग्राहकांची लगबग सुरू असताना मात्र सोशल डिस्टन्सला तिलांजली दिली गेली. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये ,जी दक्षता घ्यावी लागते, ज्या अटी व नियम पाळावे लागतात त्याचा मात्र फज्जा उडाला.
रविवारी होलसेल व्यापारी असोसिएशन, रिटेल व्यापारी असोसिएशन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत सोमवारपासून बाजारपेठेतील दुकाने उघडण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यावेळी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून नियम व अटी घालून दुकाने उघडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज सोमवार सकाळी सातपासूनच वाहनांमधून ग्राहक गांधीनगर बाजारपेठेत येऊ लागले. पाहता पाहता गर्दी वाढतच गेली. रमजानचा सण तोंडावर असल्यानेही ग्राहक खरेदीसाठी येत होते. बाजारपेठेत आलेल्या काहींनी मास्क लावले नव्हते. दोन व्यक्तींमध्ये जे ठराविक अंतर ठेवण्यास हवे होते ते ठेवले जात नव्हते.
खरेदीच्या नादात ग्राहकांना सोशल डिस्टन्सचा विसर पडला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो की काय ,अशी भीती प्रत्येक जण बोलून दाखवत होता. मात्र त्याबद्दलची दक्षता घेतल्याचे दिसून येत नव्हते. गांधीनगर बाजारपेठेतील वळीवडे हद्दीत मास्क नसलेल्या लोकांवर ग्रामपंचायतीने कारवाई केली.
सकाळी सातपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवायची असा निर्णय झाला होता. त्यानुसार गांधीनगर पोलिसांनी सायंकाळी सहा वाजता व्यापाऱ्यांना दुकाने बंद करावयास भाग पाडले.


ग्रामपंचायतींना विश्वासात घ्यावयास हवे होते

Advertisements

गांधीनगर बाजारपेठेत गांधीनगरसह उचगाव, गडमुडशिंगी, वळीवडे व चिंचवाड या गावांचा समावेश होतो. बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेताना संबंधित गावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विचारात घेणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल या गावातील ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

       कामगारांच्या सुरक्षेचे काय?

बाजारपेठेत सेवेत असलेल्या कामगारांमधून आपल्या सुरक्षेचे काय अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
मास्क, सनिटायझर याची दक्षता दुकानदारांनी घेतली असली तरी संसर्ग होणार नाही अशी खात्री देता येत नाही, असेही कामगार वर्गात बोलून दाखवले जात होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *