कोल्हापूर प्रतिनिधी/ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आशा, अपेक्षा आणि पावसावरील संपूर्ण अवलंबित्व यांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारे गायक उदय पाटील यांचे ‘पडर पाण्या, पडर पाण्या, कर पाणी पाणी…’ हे गीत सध्या शेतकरी आणि ग्रामीण रसिकांच्या मनाला भिडत आहे. पावसाची प्रतीक्षा करत आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या भावना या गीतातून प्रभावीपणे व्यक्त झाल्या आहेत.
राज्यातील अनेक भागांमध्ये दरवर्षी दुष्काळ, अनियमित पाऊस आणि बदलते हवामान यामुळे शेतकरी संकटांचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत हे गीत केवळ मनोरंजन न राहता शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव मांडणारे भावगीत ठरत आहे. गीतातील शब्द आणि स्वर ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ जपतात आणि शेतकऱ्यांच्या मनातील आर्त हाक श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात.

उदय पाटील यांच्या आवाजातील भावस्पर्शी सादरीकरणामुळे गीताला अधिक प्रभाव प्राप्त झाला आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबामध्ये पीक, कुटुंब आणि भविष्यातील आशा पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना या गीतातून जिवंत झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
सामाजिक माध्यमांवरही या गीताला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांनी या गीताशी भावनिक नाते जोडल्याचे व्यक्त केले आहे. शेती आणि शेतकरी यांच्याविषयी समाजात संवेदनशीलता निर्माण करण्याचे काम हे गीत करत असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.
ग्रामीण संस्कृती, निसर्ग आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाला स्वरबद्ध करणारे ‘पडर पाण्या, पडर पाण्या, कर पाणी पाणी…’ हे गीत केवळ एक कलाकृती नसून, शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांचा आणि पावसासाठीच्या प्रार्थनेचा जणू भावनिक दस्तऐवज ठरत आहे.
