ग्रामीण प्रेमकहाणी ‘धप्पा’ची टीम कोल्हापुरात; तरुणाईशी साधला संवाद
विशेष वृत्त : ग्रामीण मातीतील निरागस प्रेमाची हळुवार कहाणी उलगडणाऱ्या आगामी मराठी चित्रपट ‘धप्पा’च्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम कोल्हापुरात दाखल झाली. दिग्दर्शक रविराज लिंबादास वाव्होळे, अभिनेता सागर भंडारे आणि अभिनेत्री प्रतिक्षा अत्राम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत तरुणाईशी दिलखुलास गप्पा मारल्या. कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने टीम भारावून गेली.
‘वृंदावन एंटरटेनमेंट अँड फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटातून सागर भंडारे आणि प्रतिक्षा अत्राम ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. प्रेम, मैत्री, संघर्ष आणि आयुष्यातील अनपेक्षित वळणांची भावस्पर्शी कहाणी चित्रपटातून उलगडणार आहे.
चित्रपटातील ‘ये दूरिया’ हे कव्वाली गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, दिग्दर्शक रविराज वाव्होळे यांनीच त्याचे संगीत, संगीत संयोजन आणि शब्दरचना केली आहे.
‘धप्पा’ ही प्रेक्षकांना आपल्या आजूबाजूची वाटणारी प्रेमकहाणी आहे. कोल्हापूरच्या रसिकांकडून मिळालेला प्रतिसाद आनंददायी असल्याचे दिग्दर्शक वाव्होळे यांनी सांगितले. नवोदित कलाकारांनीही प्रेक्षकांना चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहन केले.
सपना पोपट ढेरंगे, माधुरी राहुल दिवसे आणि सागर गीता चांगदेव भंडारे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ९ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.

