कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त केक कापणे, बुके, शुभेच्छा होर्डिंग्ज लावणे असे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न घेता या सर्व येणाऱ्या खर्चाला फाटा देऊन हा वाढदिवस विधायक स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय महापालिकेच्या राष्ट्रीय काँग्रेस आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी घेतला.
शहरामध्ये कोरोना साथीच्या काळात अत्यंत उत्कृष्ठ पध्दतीने सेवा बजावणाऱ्या कोरोना योध्दा १८९ आशा वर्कर्स यांना त्यांच्या सेवेसाठी प्रोत्साहानपर भत्ता म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे ३२ नगरसेवकांनी आपल्या मानधनाची रक्कम रु.३,९०,०००/- चा धनादेश आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे आज दिला.
यावेळी काँग्रेसचे गटनेते शारगंधर देशमुख व नगरसेवक दिपक केसरकर यांनी येथून पुढचे सर्व मानधन या आशा वर्कर्स् यांना प्रोत्साहानपर भत्ता म्हणून देण्याचे जाहिर केले.
यावेळी माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, गटनेता शारगंधर देशमुख, नगरसेवक अशोक जाधव, जय पटकारे, नगसेविका सौ.माधूरी लाड, सौ.जयश्री चव्हाण, उपआयुक्त निखील मोरे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, दिग्वीजय मगदूम, आश्पाक आजरेकर, डॉ.रुपाली यादव, कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स् व गट प्रवर्तक युनियनच्या जिल्हा अध्यक्षा नेत्रदिपा पाटील, शहर अध्यक्ष ज्योती तावरे, गट प्रवर्तक पुनम कुंभार, सुर्या तेरदाळे, वनिता पाटील, सुजाता पोवार आदी उपस्थित होते.