Getting your Trinity Audio player ready...
|
रुग्णसेवेची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्या- बाबत सीपीआर प्रशासनास सूचना
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेले चार महिने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनास यश आले असताना, गेल्या दहा दिवसातच रुग्णांची संख्या हजारांच्या घरात पोहचली आहे.
त्यातच काल बेड अभावी कोरोना रुग्णाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड होत आहे. अशाप्रकारे उपचाराअभावी आजतागायत तीन रुग्ण दगावले असून, या रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, राज्य शासनाच्या महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेवूनही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना कडक सूचना द्या, होम क्वॉरंटाईनचे बनावट शिक्के मारणाऱ्या सीपीआर मधील टोळीवर कारवाई करा, आदी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर प्रशासनास दिल्या.
बेड अभावी कोरोना रुग्णाचा झालेला मृत्यू आणि सीपीआर रुग्णालयातील कारभार आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सीपीआर रुग्णालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या सुरवातीसच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर रुग्णालयात अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणा योग्य रीतीने सांभाळण्यात येत आहे. पण २३ जुलै रोजी बेड शिल्लक नाही, म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णाला कसे काय सांगितले जाते? शिल्लक नसल्यास त्या रुग्णास इतर रुग्णालयात का दाखल करून उपचार करण्यात आले नाही, असा प्रश्नांचा भडीमार करीत रुग्ण दगावला त्या दिवशी आठ बेड शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
याचबरोबर शासनाच्या महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेची कोरोना बाबतची नियमावली काही खाजगी रुग्णालयांकडून वेशीवर टांगण्यात आली आहे. सीपीआरमधून रुग्ण पळवणारी टोळी कोरोना पेशंटवर उपचार करण्यास का पुढे येत नाही? महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ रुग्णालयांना कोणती नियमावली आखून देण्यात आली आहे. त्या नियमावलीनुसार कोणते रुग्णालय अमलबजावणी करतात आणि कोणते करत नाहीत याचा अहवाल द्या, जे रुग्णालय शासनाची नियमावली पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा.
रुग्णालयांनी आपली जबाबदारी सांभाळावी, प्रशासनानेही नागरिकांसाठी जनआरोग्य योजनेतून मंजूर होणाऱ्या कोरोनाचे पॅकेजची माहिती जाहीर करावी. रुग्णांच्या आयुष्याशी खेळू नये, कोणत्याही रुग्णाला उपचारात कुचराई होता कामा नये. रुग्णालयाच्या काही समस्या असतील तर त्यांची तातडीची बैठक घेवून समस्यांचे निराकरण करावे, अशा सूचना दिल्या.
यावेळी बोलताना अधिष्ठाता डॉ.आरती घोरपडे यांनी, बेड अभावी दगावलेल्या पेशंटच्या मृत्यूबाबत चौकशी करून अहवाल दोन दिवसात सादर करण्याची ग्वाही दिली.
यामध्ये कोणी दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यासह खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णाकडून लाखोंच्या रक्कमेत बिले दिली जात असल्याचा प्रत्यक्ष अनुभव स्वत:स आला असून, महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्याची जबाबदारी खाजगी रुग्णालयांनी घ्यावी. होम क्वॉरंटाईनचे बनावट शिक्के मारणाऱ्या टोळीची चौकशी करून कारवाई करू. सीपीआर प्रशासन कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची आपली मर्यादा वाढवत असून त्याप्रमाणे यंत्रणाही सुसज्ज होत आहे. परंतु मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. यातून निश्चितच मार्ग काढून कोणताही रुग्ण उपचारा पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यासह कोणत्या रुग्णालयात बेड शिल्लक आहेत, रुग्णावर कोणत्या रुग्णालयात उपचार करणे शक्य आहे याचा समन्वय ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया -कडून अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहितीही दिली.
यानंतर बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी. केम्पीपाटील यांनी शासन नियमावलीनुसार महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असनाऱ्या रुग्णालयांनी रुग्णालयातील बेडच्या ८० टक्के रुग्ण दाखल करणे बंधनकारक आहे. या संदर्भात सोमवारी सर्वच रुग्णालयांची बैठक घेवून, तातडीने या रुग्णालयांना उपचारासंदर्भात सूचना देण्यात येतील, असे सांगितले.
या बैठकीस महात्मा डॉ.सुभास नागरे, सी.पी.आर. रुग्णा -लयाच्या एम.एस. डॉ.सांगरूळकर, अॅपल हॉस्पिटलच्या एम.डी. डॉ.गीता आवटे, डायमंड हॉस्पिटलचे डॉ.साईप्रसाद आदी उपस्थित होते.
बैठकीत राजेश क्षीरसागर यांनी मांडलेले ठळक मुद्दे
१. कोरोना लढाईत कष्ट घेणाऱ्या आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय, सीपीआर प्रशासन, मनपा प्रशासन, डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार यांची मनपूर्वक अभिनंदन..
२.शासनाची नियमावली डावलून कोरोना उपचारा -साठी रुग्णाकडून जादा पैसे आकारणाऱ्या रुग्णालयांची गाठ शिवसेनेशी, आर्थिक लुबाडणूक झाली असल्यास रुग्णांनी/नातेवाइकांनी शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन.
३. वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असून मनुष्यबळा अभावी रुग्णावर वेळेवर उपचार होत नाहीत. त्यामुळे सामाजिक व माणुसकीच्या भावनेतून जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांनी सीपीआर सह इतर कोरोना केंद्रांवर सेवा बजावावी.
४. नागरिकांपर्यंत खात्रीलायक वृत्तपोहचण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी अहोरात्र काम करीत आहेत. कोणतीही अफवा पसरू नये, नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांना योग्य ती माहिती पुरवून त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे.
चौकट
बनावट शिक्के मारणाऱ्या दलालांच्या या टोळीवर कडक कारवाई करा.
कोल्हापुरातील परिस्थिती चांगली होती, परंतु स्थलांतरीत लोकांना परस्पर बनावट होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून तपासणी न करताच घरी पाठविण्यात आले. त्याचमुळे कोल्हापुरात रुग्णांची संख्या वाढली गेली. बनावट शिक्के मारणाऱ्या दलालांच्या या टोळीवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर प्रशासनास केली.