कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : शहरामध्ये कोरोनाचा पेशंट वाढत आहेत. त्यामुळे आपणास अधिक जबाबदारीने काम करावे लागणार आहे. महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, वैद्यकीय, समन्वय अधिकारी व प्रभाग समिती सचिव यांची निवडणूक कार्यालय येथे सकाळी १० वाजता व्हेबएक्स व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे यांनी बोलतांना को मार्बीड असलेले १,५६,००० रुग्ण असून, त्यामध्ये ६६० हायरिस्क रुग्ण आहेत. यामध्ये ज्यांना दमा, क्षयरोग, मधुमेह, हृदयरोग उच्यरक्तदाब, फुफुसांचे इतर आजार, कर्करोग, मुत्रपिंड इतर जुने आजार असणा-यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागामध्ये सरासरी ८ लोक असून यांच्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच १३११६ मिडियम रिस्क रुग्ण व १,४२,२२४ लो रिस्क रुग्णामध्ये आजाराचे प्रमाण कमी प्रमाणात आढळले आहे.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलतांना, सर्व रुग्णांची लिस्ट प्रभाग समिती सचिवांना देण्यात यावी. त्याचप्रमाणे उपशहर अभियंता यांनी आज सायंकाळ पर्यत ही लिस्ट सर्वच सदस्यांना देण्यात यावी. सदस्यांनी प्रभाग समिती सदस्य मार्फत प्रभागामध्ये सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक यांची मदत घेऊन रुग्णांवर लक्ष ठेवण्यात यावे. वैद्यकीय अधिकारी यांनी जे रुग्ण हायरिस्क मध्ये असतील त्याठिकाणी दैनदिन भेट दिली पाहीजे. त्याचप्रमाणे प्रभाग समिती सचिव, उपशहर अभियंतांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रभागामध्ये अधिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. हायरिस्क रुग्ण असलेल्या ठिकणी भेटी दिल्या पाहिजेत. आपणास पुढील १५ दिवस महत्वाचे आहेत. यावेळेत कोणताही रुग्ण मयत होता कामा नये, याची सर्वानीच काळजी घेण्यात यावी. आत्तापर्यंत सर्वांनी चांगले काम केलेले आहे. परंतू आता रुग्ण वाढत असलेने टेस्टींग वाढवा. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. प्रभाग समिती सचिवांनी भागामध्ये कुठेही मयत व्यक्ति, लग्न समारंभ, वाढदिवस त्याठिकाणी गर्दी होऊ देऊ नका. अंत्यसंस्कारासाठी दहाच लोक जातील, याची काळजी घ्या. प्रभागामध्ये जनजागृतीसाठी शिक्षकांची मदत घ्या. यासाठी त्यांना प्रभागातील ठिकाणे निश्चित करुन द्या. ते कोरोना योध्दा म्हणून त्या त्या भागात दैनंदिन जनजागृती करतील. ज्यांच्या घरी लग्न समारंभाचा कार्यक्रम असेल त्यांनी उपस्थितांची यादी विभागीय कार्यालयांना अथवा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे द्यावी. या यादीप्रमाणे तेवढेच लोक तिथे हजर आहेत का याची तपासणी करण्यात यावी. ज्यांचा होमिओपॅथीक औषधाचा पहिला डोस घेऊन एक महिना झाला आहे. त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी सुचना करा. सर्व डॉक्टरांनी आपली काळजी घ्यावी. आपल्या स्टाफच्या सुरक्षीततेची काळजी घ्यावी. आपल्या कर्मचा-यांमध्ये जनजागृती करुन, त्यांना प्रोत्साहीत करावे. सर्वानी सुरक्षीत पीपीई किट घालून काम करावे सर्वानी स्वताची काळजी घेणे गरजेचे आहे.
जेष्ठ नागरीक, लहान मुले यांची जास्त काळजी घेणे गरजेचे असून, त्यांना भाजी मार्केट मध्ये येण्यास व भाजी पाला विक्रीस बंदी करण्यात यावी. होम क्वारंनटाईन नागरीकांच्या घरावर अधिक लक्ष ठेवा. काहीच लक्षणे नसलेल्या पॉझीटिव्ह पेंशन्टना खाजगी हॉस्पीटलच्या परवानगीने त्यांच्या देखरेखीखाली घरी स्वतंत्र व्यवस्था असल्यास उपचार करता येईल. खाजगी हॉस्पिटल मध्ये किती बेड उपलब्ध व आकारण्यात येत असलेल्या दराची माहिती प्रथम दर्शनी लावण्यात यावी. त्याचप्रमाणे सफाईसाठी कर्मचारी अपूरे पडत असतील तर जे महापालिकचे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. व ते ६२ वर्षाच्या आतील आहेत. त्यांना काम करण्याची इच्छा असलेस पुन्हा नॉन कोविडच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात हजर करुन घ्या तसा प्रस्ताव आरोग्यविभागाने सादर करावा. कोविड रुग्णच्या सेवेसाठी कर्मचारी कमी पडू देऊ नका, शाळा, हॉल, मंगल कार्यालय ताब्यात घेण्यात यावीत. धर्मशाळा व हॉस्पिटल येथे कोविड सेंटर मध्ये काम करणा-या कर्मचा-यांना घरी जाता येत नाही. त्या स्टाप करिता या कालावधी साठी त्यांना याठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना उपशहर अभियंता यांना डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटील, वैद्यकीय अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक जयंवत पोवार, प्रभाग समिती सचिव व मान्यवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.