विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : सिंधी सेंट्रल पंचायतीच्या थकीत करवसुलीच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन करण्यात आले.
सरपंच रितू लालवाणी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी त्यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. ग्राम विकास अधिकारी चंदन चव्हाण यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांच्या प्रश्नांच्या भडीमारासमोर तो व्यर्थ ठरला. आंदोलकांनी ग्रामपंचायत प्रशासनाचा धिक्कार केला. जोरदार घोषणांनी ग्रामपंचायत परिसर दणाणून गेला. आंदोलनाचे नेतृत्व दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे, अशोकराव गायकवाड यांनी केले.
प्रा. अमोल महापुरे ग्रामविकास अधिकाऱ्यांना म्हणाले की स्थापनेपासून सिंधी सेंट्रल पंचायतीचा करवसूल का होत नाही? एखाद्या गरीबाचा कर थकित झाला तर त्याच्याकडून तगादा लावून तो वसूल केला जातो. पण पंधरा पंधरा वर्षे सिंधी सेंट्रल पंचायतीकडून करवसुली का होत नाही? त्यावर ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी प्रश्नांची सरबत्ती करून ग्रामपंचायत प्रशासनच दोषी असल्याचे दाखवून दिले.
ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रक्रिया सुरू असून त्यास दोन महिने कालावधी लागणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र आंदोलकांचे या उत्तराने समाधान झाले नाही. सरपंच रितू लालवानी ग्रामपंचायत कार्यालय सोडून पळून का गेल्या, त्यांना आंदोलकांसमोर बोलवा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. पण अखेरपर्यंत सरपंच आल्याच नाहीत.
या आंदोलनात आप्पासाहेब कांबळे, निखिल पोवार, राजू कांबळे, अमोल साळे, रामभाऊ साळोखे, नबीसाहेब नदाफ, अनिल हेगडे, सागर बुरुड, महेश माळी, सचिन कोरे सहभागी झाले.