विशेष प्रातिनिधी सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : गर्दी, वाजंत्रीला फाटा देत कोरोना महामारीची दक्षता घेत गांधीनगरसह परिसरात विसर्जन कुंडामध्ये घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करून आपल्या लाडक्या गणरायाला भक्तांनी शांततेत निरोप दिला.
गांधीनगर ग्रामपंचायतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक प्रभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी विसर्जन कुंड तयार केले. त्यात पाणी भरून मूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. प्रत्येक भक्ताने सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करत जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले. सर्व मूर्ती एकत्रित करण्यात येत होत्या. निर्माल्य जमा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. जेणेकरून प्रदूषण होणार नाही, याची सर्व ती दक्षता ग्रामपंचायत प्रशासनाने घेतल्याचे दिसून येत होते.
यावेळी सरपंच, ग्राम विकास अधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी हे सर्व कार्यरत होते.
वळीवडे ग्रामपंचायतने प्रत्येक प्रभागामधील गणेश मुर्ती नदीपात्रात बुडवून त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पात्राबाहेर एकत्रित केल्या. सर्व मूर्ती एकत्रित करून त्यांचे योग्य ठिकाणी विसर्जन करण्याचे ठरवले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्राम विकास अधिकारी, स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळांचे कार्यकर्ते कार्यरत राहिले. उंचगाव ग्रामपंचायतीने प्रत्येक वर्गामध्ये गणेश मुर्ती विसर्जना साठी कुंड तयार करून मूर्तीचे विसर्जन केले. त्या मुर्त्या एकत्रित करून गावच्या खाणीमध्ये ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने विसर्जन करण्याचे ठरवले. त्यावेळी प्रत्येक वार्डातील नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्राम विकास अधिकारी, कर्मचारी यांनी गावासाठी श्रम घेतले. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने कोरोना महामारीचा संसर्ग होऊ नये म्हणून योग्य ती दक्षता घेतली. ग्रामपंचायतीने प्रत्येक वार्डात विसर्जनाची व्यवस्था केली होती. ग्रामपंचायतीने एकत्रित मूर्तींचे दान करण्याचे ठरवले आहे.
यावेळी ग्रामस्थ, प्रशासक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
चिंचवाड ग्रामपंचायतीने घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायतीसमोर कुंड तयार केला होता. त्यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवून मास्क, सॅनिटायझर वापरत गणेश मुर्ती विसर्जित करण्यात आल्या. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व मूर्तीं एकत्रित करून दान करण्याचे ठरले आहे. यावेळी सरपंच, ग्राम विकास अधिकारी, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ गावातील स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.