विशेष प्रतिनिधी :सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : गांधीनगरमधून वळीवडेस जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याच्या निषेधार्थ आज गुरुवार दि. 3 सप्टेंबर रोजी निरंकारी कॉलनी समोरील रस्त्यावर दलित महासंघाने चिखल भरो आंदोलन केले.
रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांना धारेवर धरले. आंदोलनाचे नेतृत्व गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी केले.
वळीवडे कॉर्नर ते वळीवडे हा रस्ता सहा महिन्यांपासून मरणयातना सोसत आहे, अनेक जण अपघातग्रस्त झाले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत जेथे रस्त्यावर खड्डे पडले आहेत तेथे ते चिखल भरून बुजविण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या.
आंदोलकांसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले गेले. आंदोलकांनी त्यांना रस्त्याकडे सहा महिने दुर्लक्ष का केले, याचा जाब विचारला. त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. रस्ता केव्हा दुरुस्त करणार, याचे प्रथम उत्तर द्या अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यावर इंगवले म्हणाले की, दसरा-दिवाळीनंतर रस्ता दुरुस्त करू. या उत्तराने आंदोलक आणखी संतप्त झाले. ताबडतोब रस्ता दुरुस्त झाला पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर पुढील महिन्यात रस्ता दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन इंगवले यांनी दिले.
या आंदोलनात दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे, विभाग प्रमुख निखिल पोवार, वीरेंद्र भोपळे, उपाध्यक्ष अनिल हेगडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे, सचिन कोरे, गणेश पाटोळे, मोहन बोराडे आदींनी सहभाग घेतला.