कामगार विभागामार्फत चार कोटी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार :कामगार मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत कल्याणकारी मंडळांच्या माध्यमातून चार कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षितता आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणार असून निराधारांसाठीची एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल येथे चार कोटी तीस लाख रूपयांच्या विविध विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्नपूर्णा शुगर चे चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. 

मंत्री मुश्रीफ  म्हणाले,  गेली ३५ वर्षे माझ्यात व संजय घाटगे यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष झाला,मात्र आयुष्याच्या उतारवयात तालुक्याचा विकास करण्यासाठी आणि तालुक्यातील शेवटच्या माणसांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. शेंडूर गावासाठी फिल्टर हाऊससह नवीन पाणी योजना कोणत्याही परिस्थितीत करणारच असे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले. 

Advertisements

अध्यक्षीय मनोगतात माजी आमदार संजयबाबा  घाटगे म्हणाले, संघर्ष करून आणि झगडून विकास होत नाही. मंत्री मुश्रीफ यांनी विरोधक असूनही अन्नपूर्णा शुगर कारखान्यासाठी आर्थिक मदत केली आहे, म्हणूनच त्यांच्यासोबत राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व तालुक्याच्या विकासासाठी रात्रंदिवस झगडणारे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब हे महाराष्ट्रातील एकमेव आदर्शवत मंत्री आहेत. विकास कामांसाठी निधी मागणाऱ्यांची झोळी फाटेल, परंतु हसन मुश्रीफ यांच्यासारख्या देणारा दमणार नाही. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे राहू या. 

 

यावेळी सरपंच अमर कांबळे,लक्ष्मण गोरडे, संदीप लाटकर, सुखदेव मेथे यांनीही मनोगत व्यक्त केले. कोविड योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबुराव शेवाळे व सुशांत डोंगळे यांचा सत्कार झाला. व्यासपिठावर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, अंबरिषसिंह घाटगे, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत,  एम.बी.पाटील, मधुकर मेथे, गुणाजीराव निंबाळकर, दत्तात्रय पाटील, शिवसिंह घाटगे, धनराज घाटगे, युवराज कोईगडे, युवराज पाटील, बाळासाहेब तुरंबे आदी उपस्थित होते. स्वागत उपसरपंच अजित डोंगळे यांनी केले. सुत्रसंचलन विवेक गवळी यांनी तर आभार संजय डोंगळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *