Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष लेख-
लेखिका: श्रीमती अलका सानप
(सरचिटणीस दलित साहित्य अकादमी बृहन्मुंबई.)
“हसून प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती शक्ती आहे एक नारी”
यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’, या पुरुषप्रधान संस्कृतिप्रिय वाक्य खोडून काढत स्त्रीने आज पुरुषांनाही मागे टाकत यशाच्या शिखरावर झेप घेतली आहे. प्रत्येक आव्हान पेलत आपणही पुढे जायचे या जिद्दीने, चिकाटीने आणि आत्मनिर्भर होण्याच्या ऊर्मीने ती सतत काही ना काहीतरी धडपड करत एक एक यशाचे रुपेरी पाऊल पुढे टाकत आहे. ती कुठेतरी व्यवसायात पाय रोवून उभी आहे. स्वतःतील कलाकौशल्यांना तिने गरुड पंख देत नवयुगात ती आपले पंख पसरून आभाळाकडे झेप घेत
आहे, इतर महिलांच्या हातालाही काम देत मदत करत आहे. महिला आरोग्य, फिटनेस,विविध व्यवसाय,यशस्वी क्षेत्र, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांत ती आपल्या परिवारास घेवून नावलौकिक मिळवत आहे.
त्याचबरोबर कुटुंबव्यवस्था हा आपल्याकडील महत्त्वाचा सामाजिक घटक आहे आणि त्याबद्दल अनेक जण अभिमानाने बोलतही असतात. परंतु या व्यवस्थेमुळे समाजाचा डोलारा उभा आहे, हे नाकारता येणार नाही. स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते खरे; परंतु संसारथाचा तोल सावरला जातो, तो स्त्रीमुळेच. पुरुषसत्तेने स्त्रीला कायम कमकुवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला खरा पण तिने सर्व जबाबदाऱ्या सांभाळत
आपली प्रगती करीत आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण पुरुषांपेक्षा कमी नाही हे ती आज सिद्ध करीत आहे. स्त्री म्हणजे त्यागाची मूर्ती, परमेश्वराचे रूपच जणू. स्त्री म्हणजे सहनशीलतेचा कळस. संसारात तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. ती नसेल तर कुटुंब कोमेजते,कोलमडते. रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा डोलारा सांभाळते; पण आपल्या मुलांबाळांना त्याची झळ पोहोचू देत नाही. याठिकाणी बहिणा बाईंच्या या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
अरे संसार संसार । नाही रडणं कुडनं ।
येड्या गळ्यातला हार । म्हणू नको रे लोढणं ।
गेल्या शतकात स्त्री हक्कांबाबत झालेल्या चळवळी, स्त्रीवादाचा स्वतंत्र अभ्यास, त्याबाबतचा जागर या सर्वांचा हा व्यापक परिणाम आहे. आठ मार्चला साजरा होणारा जागतिक महिला दिन हेही याचेच फलित आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अलीकडच्या काळात महिला दिन मोठ्या उत्साहात सादरा केला जातो. महिलांचे हक्क, त्यांची कर्तबगारी, त्यांनी मिळविलेले यश या साऱ्यांच्या कथा या दिवशी सांगितल्या जातात. महिला दिनाच्या निमित्ताने ते व्हायलाही हरकत नाही. मात्र, महिला दिनाला फक्त एक दिवसाचे प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त होऊ नये. स्त्रीला एक दिवसापुरते देवत्व बहाल करून, उदोउदो करून तिचा होता होईल तेवढा छळ करण्याची पुरुषी मानसिकता आणि महिला दिनाला प्रतीकात्मक महत्त्व वाढवून स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहण्याची वृत्ती या दोहोंत फरक नाही. याचे भान समस्त समाजाला येणे आवश्यक आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला भगिनींना अनंत अनंत हार्दिक शुभेच्छा..!!