शंकराचार्य पीठाच्या जयंती उत्सवाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते उद्धाटन…!

 

कोल्हापूर/प्रतिनिधी ता. ९ – येथील श्री स्वामी जगदगुरू शंकाराचार्य करवीर पीठ येथे बुधवारपासून आद्य शंकराचार्यांचा २५३० वा जयंती उत्सव होणार असल्याची माहिती प.प. श्री विद्यानृसिंह भारती यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांनंतर भक्तांच्या अपूर्व उत्साहात हा उत्सव होईल, असे सांगून स्वामीजी म्हणाले, येत्या बुधवारपासून (ता. ११) ते सोमवार (ता. १६) असे आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कीर्तन, प्रवचन, गायन, हवन या धार्मिक कार्यक्रमांबरोबर पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, पालखी प्रदक्षिणा अशा प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये केले आहे.

Advertisements

ते म्हणाले, रविवार, ता. १५ मे रोजी करवीर पीठाचा इतिहास या पुस्तकाच्या प्रकाशनासोबत पुरस्कार वितरण होईल. यामध्ये वैदिक पुरस्कार वे.शा.सं गोपाळ जोशी, पुणे, सांस्कृतिक पुरस्कार राजारामशास्त्री शुक्ल, वाराणसी, कीर्तनकार पुरस्कार प्रकाश मुळे, जालना, स्थानिक वैदिक पुरस्कार गुरुप्रसाद विनायक पुजारी, कराड, सामाजिक गौरव पुरस्कार बीव्हीजी ग्रुपचे डॉ. दत्तात्रय गायकवाड, पुणे, महिला कीर्तनकार पुरस्कार कांचन अनिल नाजपांडे, नागपूर व होतकरू विद्यार्थी पुरस्कार दत्तात्रेय यज्ञेश्वर जोशी यांना प्रदान करण्यात येईल. पीठामध्ये सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गो. बं. देगलूरकर उपस्थित राहतील.

सोमवारी, ता. १६ मे रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यादिवशी दुपारी ४ वाजता पालखी प्रदक्षिणा होईल. शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी करवीर निवासिनी अंबाबाईला जाईल व तेथून परत ती पीठात येईल. तत्पूर्वी पीठामध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते पालखीचे पूजन होईल.

दरम्यान, आठवडाभर संजय व्यास, प्रमोदशास्त्री कुलकर्णी, राजेश्वर शास्त्री, अभिषेक पटवर्धन, अनिरुद्ध जोशी, राजाराम शास्त्री शुक्ल आपली सेवा देतील. या निमित्ताने पीठामध्ये मंडपाच्या सजावटीसह इतर गोष्टींची तयारी सुरू आहे.

कोरोनानंतर होणाऱ्या या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहतील. त्यांची राहण्याची व्यवस्था पीठामध्ये केली आहे. याचबरोबर स्थानिक भक्तानी उपस्थित राहून विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी यावेळी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *