Media Control Online
आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेना सोडणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार आहोत, अशा शब्दांत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुढील राजकारणाचे संकेत दिले आहेत. आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही. शिवसैनिकांनी कोणतंही बंड केलेलं नाही. आम्ही पक्षाच्या विरोधात कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आसामच्या गुवाहाटीत पोहोचले आहेत.
विधान परिषद निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर शिंदे आणि त्यांचा समर्थक गट सूरतला रवाना झाला. सुरतमुक्कामी असलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे नेमके किती आमदार आहेत, याबाबत मंगळवारी सकाळपासून विविध आकडे सांगितले जात होते. कुणी १३… कुणी २०… कुणी ३०… अशी ती आकडेवारी होती. मात्र, खुद्द एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत वृत्तवाहिन्यांशी बोलताना, ‘माझ्यासोबत ४० शिवसेनेचे आमदार आहेत,’ असा दावा केला. ५५ आमदारसंख्या असलेल्या शिवसेनेतील ४० आमदार शिंदे यांच्यासोबत खरोखरच असतील, तर शिवसेनेपुढे अभूतपूर्व असा राजकीय व तांत्रिक पेच निर्माण होईल, हे स्पष्ट आहे.