भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांना मातृशोक…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे निधन झाले आहे. कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कष्टाला कमी पडू नकोस, आयुष्यात तुला काही कमी पडणार नाही, अशी शिकवण चंद्रकांतदादांना त्यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांनी कायम दिली. दादांनीही त्यांनी शिकवण अंगीकारली. कठीण परिस्थितीत संघर्ष करायला शिकवणारी मायमाऊली गेल्याने दादांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झालीय.

घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असताना दादांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांनी अतिशय संघर्षात दिवस काढले. बच्चू पाटील कापड गिरणीत कामाला असताना, पैसे अतिशय कमी मिळत असताना त्यांनी संसाराचा गाडा हाकला. चंद्रकांतदादांना शिक्षण दिलं, संघर्षाची प्रेरणा दिली. माझ्या आयुष्यात, प्रवासात माझ्या आईचा सर्वाधिक वाटा राहिलाय, अशी भावना चंद्रकांतदादा नेहमी बोलून दाखवायचे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्रींनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे. दादांच्या मातोश्रीवर आज दि. २४ जुलै रोजी रात्री ८.३० वा कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *