हा लढा काँग्रेसचा नाही तो, देशाचा आहे, देशात राहणाऱ्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचा आहे : योगेंद्र यादव….

कोल्हापूर : सध्या देशात दोनच पक्ष आहेत, एक जाळणारे आणि दुसरे विझवणारे. आम्ही विझवणारे आहोत. जर देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचे असेल तर भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन हुकूमशाही विरोधी लढा द्या. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत योगेंद्र यादव यांनी केले. ते कोल्हापुरातील धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी पक्ष संघटनेच्या वतीने आयोजित सभेत बोलत होते. मागील दोन महिन्यापासून या यात्रेला अभूतपूर्व यश मिळत आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्या ज्यावेळी लोकशाही संकटात सापडली आहे, त्यावेळी नागरिकांनी रस्त्यावर उतरून ती वाचवली आहे. सध्या तीच वेळ आली आहे, त्यामुळे अधिकाधिक संख्येने या यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

   सध्या देशभर काँगेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देश वाचविण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातील सर्व धर्मनिरपेक्षवादी आणि पुरोगामी संघटना आणि पक्षाच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड दिलीप पवार होते. तर आ ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, जेष्ठ विचारवंत व्यंक्काप्पा भोसले, माजी महापौर निलोफर आजरेकर, भरत रसाळे, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, शिवाजीराव परुळेकर, ललित बाबर, सरलाताई पाटील शारंगधर देशमुख, दुर्वास कदम, भरत लाटकर, वसंतराव पाटील, हसन देसाई, बाबुराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला स्वराज्य इंडिया संस्थापक, जेष्ठ विचारवंत, किसान नेते योगेंद्र यादव यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना यादव यांनी, या यात्रेला देशभरात मिळत असलेल्या यशाबद्दल सर्वांचं कौतुक केले. सध्या देशात संविधान संपविण्याचे घाट आखला जात आहे. गांधींचा देश गोडसेंचा बनविण्याचे कटकारस्थान सुरु आहे. गरीब जनता गरिबीने होरपळत आहे, मात्र दुसरीकडे बोटावर मोजण्या इतक्या उद्योगपतींची मात्र चांदी सुरु आहे. मागील अडीच वर्षात ९७ टक्के जनतेचं उत्पन्न घटले आणि गौतम अडाणी यांची संपत्ती १८ टक्क्यांनी वाढली आहे, ती कुणाच्या वरदहस्ताने वाढली ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सीबीआय, ईडी सारख्या संस्था केंद्र सरकारच्या हातचे खेळणं बनले आहे. त्यामुळे या प्रवृत्ती विरुद्ध लढायचे असेल तर सर्वांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन या विरुद्ध लढा देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. हा लढा काँग्रेसचा नाही तो, देशाचा आहे, देशात राहणाऱ्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचा आहे. पुरोगामी विचाराच्या सर्व पक्ष संघटना एकत्र येत आहेत, ही एका नव्या पर्वाची नांदी आहे. आजवर महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता यावर न बोलणारी आरएसएस आता बोलू लागली आहे. हेच या यात्रेच यश आहे. कारण या यात्रेमुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. जर देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन हुकूमशाही विरोधी लढा द्या. असं प्रतिपादन योगेंद्र यादव यांनी केले. जो पर्यंत ही यात्रा जम्मू काश्मीर पर्यंत पोहचेल तोपर्यंत देशात मोठा बदल घडलेला असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

Advertisements

 ज्या ज्यावेळी लोकशाही संकटात सापडली आहे, त्यावेळी नागरिकांनी रस्त्यावर उतरून ती वाचवली आहे. सध्या तीच वेळ आली आहे, त्यामुळं अधिकाधिक संख्येनं या यात्रेत सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी सर्वांना यावेळी केले.  यावेळी भारत जोडो, भारत जोडो. वो दंडेसे तोडेंगे, हम झंडेसे जोडेंगे. अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विविध पुरोगामी, धर्मनिरपेक्ष पक्ष व संघटना, त्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *