प्रशासनाकडून व्यावसायिक कारणांकरिता असलेली व स्थगनादेश नसलेली ७० अतिक्रमणे पहिल्या दिवशी काढण्यात आली

कोल्हापूर, दि. १५ : किल्ले विशाळगडावरील विविध प्रयोजनाकरिता केलेली अतिक्रमणे काढणे बाबत, प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांबाबत शासकीय महाभियोक्ता, मुंबई उच्च न्यायालय यांचे अभिप्राय मागविणेत आले होते. ते अभिप्राय आज दिनांक १५ जुलै २०२४ रोजी प्राप्त झाले असून त्यामध्ये उच्च न्यायालयात व इतर न्यायालयात ज्या याचिकाकर्त्यांना स्थगनादेश आहे, ती वगळून इतर अतिक्रमणे काढता येतील असे नमूद केले आहे.

संबंधित अभिप्राय मिळताच प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहिम काढणेस प्रारंभ केला. ही मोहिम आज सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत राबविणेत आली. उपविभागीय दंडाधिकारी यांनी विशाळगड तसेच किल्ले विशाळगड ते गजापूर चेकपोस्ट या क्षेत्रामध्ये संचारबंदी प्रतिबंधात्मक आदेश काढणेत आला.

Advertisements

मोहिमेच्या पहिल्या दिवशी ७० अतिक्रमणे काढणेत आली. यामध्ये व्यावसायिक कारणांकरिता असलेली व स्थगनादेश नसलेली अतिक्रमणे काढणेत आली. सदर मोहिमेमध्ये महसूल विभागाचे ९० कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागासह त्यांनी १५० मजूर उपलब्ध केले तसेच पुरातत्व, महावितरण, ग्रामपंचायत व वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी भाग घेतला. पोलीस विभागाचे २५० अधिकारी कर्मचारी घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी उपस्थित होते.

या मोहिमेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी पन्हाळा-शाहूवाडी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी आप्पासाहेब पवार, तहसिलदार शाहूवाडी रामलिंग चव्हाण, सहा. संचालक पुरातत्व विभाग विलास वहाणे, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग चंद्रकांत आयरेकर, उपअभियंता सा.बां विभाग धनंजय भोसले, गट विकास अधिकारी शाहूवाडी मंगेश कुचेवार यांनी आपला सहभाग नोंदविला. या मोहिमेदरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *