कोल्हापूरच्या बदलत्या शहरी चेहऱ्यामध्ये स्थानिक ओळख जपण्याची धडपड अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती प्रभाग क्रमांक ४ मधील सदरबाजार–निंबाळकर नगर परिसरात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातून आली. निंबाळकर नगर येथे प्रस्तावित नियोजित स्वागत कमानीच्या निमित्ताने नागरिकांनी एकत्र येत आपल्या परिसराच्या अस्मितेला आकार देण्याचा प्रयत्न केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२६ या सामाजिक समतेच्या आणि जागृतीच्या प्रतीक असलेल्या दिवशी कृती समितीने आयोजित केलेल्या या उपक्रमात स्वागत कमानीच्या प्रतिकृती फलकाचे उद्घाटन पार पडले. कोमनपा चे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनाने कार्यक्रमाला औपचारिकतेपेक्षा अधिक सामाजिक अर्थ प्राप्त झाला.

या कार्यक्रमात विद्यमान व माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्ग बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही उपस्थिती केवळ एका वास्तूच्या उद्घाटनापुरती मर्यादित नसून, बहुजन समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या या परिसराच्या सामूहिक सहभागाची आणि एकात्मतेची साक्ष देणारी होती.
स्वागत कमान ही केवळ प्रवेशद्वार नसते; ती त्या भागाच्या सांस्कृतिक ओळखीची, इतिहासाची आणि सामूहिक भावनेची प्रतीकात्मक अभिव्यक्ती असते. शहरांच्या वेगवान विकासात हरवणाऱ्या स्थानिक वैशिष्ट्यांना जपण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. यावेळी बोलताना नगरसेवक राजेश लाटकर यांनी या कमानीच्या उभारणीसाठी आवश्यक ते प्रभागातील चारही नगरसेवक सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.“ही कमान लवकरात लवकर साकार व्हावी, यासाठी मी स्वतः जबाबदारीने प्रयत्नशील राहीन,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
एकूणच, निंबाळकर नगरातील हा उपक्रम हा केवळ नावलौकिक मिळवण्याचा आराखडा नसून, तो स्थानिक समाजाच्या एकजुटीचा आणि आपल्या परिसराविषयीच्या जिव्हाळ्याचा ठसा उमटवणारा प्रयत्न ठरणार आहे. भागातील नागरिकांच्यात मात्र यापूर्वीच स्वागत कमान प्रवेशद्वार अस्तित्वात यायला पाहिजे होती असे जमलेल्या गर्दीत चर्चा सुरू होती
या वेळी भागातील नगरसेवक स्वाती कांबळे, विशाल चव्हाण, दिपाली घाटगे, माजी नगरसेवक अशोकराव भंडारे, बाबासाहेब ठोकळे, प्रवीण वाघमारे, रवी चौगुले, अशोक मोरे, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
