कौटुंबिक वादातून पत्नीचा खून

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कौटुंबिक वादातून पतीकडून झालेल्या मारहाणीत पत्नी पल्लवी जयंत वाठारकर (वय २३) हीचा खून झाला. हा प्रकार रविवारी पहाटे घडला. याप्रकरणी पती जयंत संजय वाठारकर (वय.२५, रा. मूळ कणेरीवाडी सध्या महालक्ष्मी नगर मणेर मळा,उचगाव ता. करवीर, जि. कोल्हापूर) यास गांधीनगर पोलिसांनी अटक केली. ही घटना उचगाव येथील मणेरमळा मधील महालक्ष्मी नगर येथे घडली.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली व पोलिसांनी सांगितलेली अधिक माहिती अशी की, जयंत आणि पल्लवी यांचा अडीच वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. या विवाहास जयंतच्या घरच्या लोकांचा विरोध होता. त्यामुळे ते दोन वर्षांपासून मणेरमळा येथील महालक्ष्मी नगर येथे भाड्याने राहत होते. जयंत हा आई वडिलांच्या घरी जात असल्याने त्या दोघांच्यात वारंवार वाद होत होता. पल्लवीचे माहेर ही मणेरमळा येथेच आहे. दरम्यान यांना दीड वर्षाची एक मुलगी आहे.
शनिवारी रात्री या दोघांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यावेळी जयंत याने पल्लवीला मारहाण केली. यामध्ये जयंत च्या हातातली कडे पल्लवीच्या मानेवर लागले त्यामध्ये रक्तस्त्राव झाला. तिला प्रथम राजारामपुरी येथील खाजगी रुग्णालयात नेले, तेथून तिला सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
याबाबतची फिर्याद पल्लवीची आई नंदा सुरेश पवार
( रा. हुंकार कॉलनी मणेर मळा, उचगाव ता.करवीर ) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान घटनास्थळी करवीरचे पोलिस उप अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली. याबाबत अधिक तपास गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर हे करत आहेत.

Advertisements

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *