१८९७ , १९२० या साली आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वेगळा आदर्श घालून दिला.

जिल्हा माहिती कार्यालय : जिल्ह्यामध्ये अजून सामाजिक संसर्ग झालेला नाही. येथून पुढेही कोणत्याही प्रकारे सामाजिक संसर्ग होवू द्यायचा नाही आणि आपल्या जिल्ह्यात कमी असणारा मृत्यूदर यापुढेही वाढू द्यायचा नाही, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “मी स्वत: सुरक्षित राहणार आणि गावाला सुरक्षित ठेवणार, कोणतीही आपत्ती हरवू शकणार नाही,” अशा पध्दतीने सतर्क राहून काम करावे, असा आत्मविश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व सरपंच, आशा वर्कर, ग्याम समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक,तलाठी, ग्राम विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

Advertisements

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने आजपर्यंत चांगल्या पध्दतीने परिस्थिती हातळल्याने त्याचे परिणामही चांगले दिसत आहेत. सर्व तपासलेल्या बाधित रुग्णांना आपण विलगीकरणात ठेवलेले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे. त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार मानतो. परंतु, आता कोरोना युध्दाच्या वेगळ्या टप्यावर आपण येवून पोहचलो आहोत. गावात एखादी निगेटिव्ह अहवाल घेवून येणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक अथवा गृह अलगीकरणात राहायचं आहे, अशा व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत बाहेर फिरु देवू नका. आज तपासणी  अहवाल निगेटिव्ह आला म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित आहे, असे नाही. बाहेरुन गावात येणाऱ्या व्यक्तीला अलगीकरण बंधनकारक आहे. अशी व्यक्ती ऐकत नसेल तर त्यांना सक्तीने अलगीकरणात पाठवा व कारवाई करा.

१८९७ , १९२० या साली आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापनाचा वेगळा आदर्श घालून दिलेला आहे, त्याचप्रमाणे आजही आपण  कोल्हापूरचे वेगळेपण देशाला दाखवून देवूया. त्याच पध्दतीने सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतोय, ही भावना ठेवून प्रत्येकाने काम करावे. अशी संधी क्वचित येते. कोल्हापूरचे हे वेगळेपण राज्याला आणि देशाला दाखवून देवूया.  जिल्ह्यात झालेल्या 4 मृत्यूंपैकी केवळ कोरोनामुळे मृत्यू असा एकही नाही. प्रत्येकाला वेगवेगळी व्याधी होती हे दिसून आले आहे. दोन प्रकरणात मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्थानिक स्तरावरील  संस्थात्मक, गृह अलगीकरणातील व्यक्तींची दररोज एमपीडब्ल्यू ए एन एम, आशा, अंगणवाडी सेविका, खासगी, शासकीय डॉक्टर यांच्यामार्फत वैद्यकीय तपासणी करा. काही लक्षणे दिसत असतील किंवा व्याधीग्रस्त असतील तर त्यांना तात्काळ सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय आणि जवळच्या कोव्हिड काळजी केंद्रात उपचारासाठी पाठवा.

माल वाहतूक, दूध वाहतूक टँकर यांच्या चालक, वाहकांसाठी गावामध्ये स्वतंत्र राहयाची व्यवस्था करा, तशी त्यांना कल्पना द्या, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करावी. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून प्रवास करुन येणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत अशा व्यक्तींचा कुटुंबातील अथवा गावातील लोकांशी संबंध येणार नाही, याची खबरदारी ग्राम समितीने घ्यावी. त्यांच्या कुटुंबाचे व अशा व्यक्तीचे योग्य समुपदेशन करावे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *