राजकीय भूकंप : ठाकरे सरकारने उद्या बहुमत सिद्ध करावे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुंबई/प्रतिनिधी, दि.२९ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. काहीवेळापूर्वीच राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावेळी ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. आता महाविकास आघाडीकडून राज्यपालांच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार का? त्यानंतर न्यायालय काय निकाल देते आणि उद्या बहुमत चाचणी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३९ आमदार आपल्या गळाला लावले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Advertisements

यांनी मंगळवारी राज्यपालांकडे धाव घेत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता. तेव्हाच राज्यपाल मुख्यमंत्री ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश कधी देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे. ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही. तसेच सभागृह तहकूब करता येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे, असा सूचनाही राज्यपालांनी पत्रात दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *