भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणी संपन्न…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरची जिल्हा कार्यकारणी चंदवाणी हॉल, ताराबाई पार्क याठिकाणी संपन्न झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य सभा नूतन खासदार धनंजय महाडिक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.

आपल्या प्रास्ताविकामध्ये जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीनंतर प्रत्येक जिल्ह्याची कार्यकारणी ही होत असते या कार्यकारणी मध्ये विविध प्रस्ताव हे पारित केले जातात असे कृषी विषयक राजकीय या विषयाची प्रस्ताव आजच्या या बैठकीत मांडण्यात येणार असून ही बैठक आपल्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने घेत आहोत. यासाठी माजी मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख व प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. या बैठकीत आलेल्या जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आगामी काळात आपापल्या मंडल आणि तालुका स्तरावर अशा तालुका बैठका घेऊन भारतीय जनता पार्टीचे आगामी कार्यक्रम हे जनतेपर्यंत पोहोचवायचे आहेत.कार्यकारणीच्या सुरुवातीला भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते आण्णा पिसाळ यांच्या दु:खद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.

Advertisements

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा यावर बोलताना नूतन राज्यसभा खासदार मा. धनंजय महाडिक हे म्हणाले, स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करत असताना या देशाचा ७५ वर्षांपूर्वीचा इतिहास पुढील पिढीसाठी व्हावा यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे यामध्ये १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत देशातल्या प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून या देशाचा स्वाभिमान जपण्याचा आहे यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी खरोखर तिरंगा ही मोहीम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करावा.

यानंतर भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांनी ओबीसी प्रस्ताव कार्यकारणी समोर मांडला याला डॉ. आनंद गुरव यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी मागील सरकारने केलेली ओबीसी समाजाची फसवणूक व वेळ काढू भूमिका सर्वांसमोर मांडली व ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिल्या बद्दल तसेच समाजाचा हा प्रलंबित प्रश्न सरकार येताच तात्काळ सोडवल्या बद्दल मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांचे आभार मानले. यानंतर प्र.का सदस्य महेश जाधव यांनी राजकीय प्रस्ताव मांडला त्याला अशोकराव माने यांनी अनुमोदन दिले. यावेळी त्यांनी मागील सरकारच्या कारनामांचा पाढा वाचला. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कार्य करणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या सरकारच्या पाठीशी राहून महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगत आगामी निवडणुकीत भाजपा जोरदार मुसंडी घेईल असा आशावाद व्यक्त केला.

यानंतर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितराजे घाटगे यांनी कृषी प्रस्ताव मांडला त्याला किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे यांनी अनुमोदन दिले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या कृषी योजनांचे फायदे सांगून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या योजनांचे फायदे करूनघ्यावेत. तसेच केंद्र सरकारने इथेनॉल प्रकल्पाला मंजुरी देऊन सर्व शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. तसेच बाजार समितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा समान अधिकार व शेतकऱ्यांना नियमित कर्ज माफी देऊन शेतकऱ्यांचा सन्मान वाढवला आहे. सरकारने जनतेसाठी योग्य निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा कार्यकारणी साठी उपस्थित असलेल्या सर्वांना माजी महाराष्ट्र राज्य मंत्री आम. सुभाष बापू देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी असंख्य योजना लागू केलेल्या आहेत. त्या योजनांचा प्रसार सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, त्यासाठी सोशल मिडिया वरती अवलंबून न राहता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन योजनांची माहिती सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. तसेच जनतेला भाजपा पक्षाचा विचार व भूमिका कोणती आहे हे समजावून सांगणे गरजेचे आहे. राज्यात भाजपा सरकार पुन्हा आल्यामुळे महाराष्ट्र विकासाचे काम पुन्हा जलद गतीने चालू होईल असे सांगितले. यावेळी केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारचे निर्णय योग्य आहेत हे सांगून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा कार्यकारणीचा समारोप करताना माजी आम. मा. सुरेश हाळवणकर म्हणाले, आज नैसर्गिकरित्या आलेले भाजपाचे सरकार सर्व निर्णय तात्काळ घेत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सरकारी योजनांचा आढावा घेतल्यास या जिल्ह्यात सर्वच योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात झाला आहे असे दिसून येईल. सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा लाभ वाढविला असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी सुद्धा आनंदी झाला आहे. अटल पेन्शन योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निर्माण केलेली योजना असून सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले.

यावेळी माजी आम. अमल महाडिक, हिंदुराव शेळके, संजय पाटील, विजय जाधव यांच्यासह भाजपा शहर व ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस, आघाडी मोर्चा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रदेश पदाधिकारी, जि. प, प.स सदस्य, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *