कोल्हापूर | प्रतिनिधी :
विश्वशांती, देशात समाधानाचे वातावरण आणि बळीराजाच्या समृद्धीसाठी वेळेवर व भरपूर पाऊस पडावा, या उदात्त भावनेतून ब्राह्मण सभा करवीरतर्फे मंगलधाम येथे शुक्रवारी अत्यंत भक्तिभावाने श्रीराम यज्ञ व राम पंचायतन हवन संपन्न झाले. वैदिक मंत्रोच्चारांच्या मंगलमय वातावरणात १००८ आहुतींचे हवन करून समाजकल्याणाचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
ब्राह्मण सभा करवीरतर्फे आयोजित श्रीराम कथा सोहळ्याच्या निमित्ताने हा धार्मिक उपक्रम पार पडला. दि. २२ ते २८ जून या कालावधीत राम गणेश गडकरी हॉल येथे ह.भ.प. मकरंद बुवा सुमत रामदासी यांचे रसाळ आणि अभ्यासपूर्ण श्रीरामकथा निरूपण सुरू असून, त्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
शुक्रवारी सकाळी गणेशपूजन, पुण्याहवाचन, श्रीराममूर्ती स्थापना, नवग्रह पूजन, देवतापूजन व पुरश्चरण या वैदिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला. त्यानंतर वैदिक ऋचांच्या निनादात श्रीराम यज्ञ संपन्न झाला. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेले होते.
यावेळी ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, डॉ. उदय कुलकर्णी, श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, प्रसाद खाडीलकर, रामचंद्र टोपकर, विवेक शुक्ल, पूजा जोशी, संतोष कोडोलीकर यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी श्रीराम कथा सोहळ्याची सांगता महाप्रसाद वितरणाने होणार असून, या धार्मिक पर्वाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
