कोल्हापूर महापालिकेत लवकरच भाजपची विजयी पताका फडकेल – मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस, भाजप….!

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्राचे नव नियुक्त प्रदेश सरचिटणीस, तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी आज कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्हा अशा दोन स्वतंत्र बैठका घेऊन जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकार्‍यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला. यावेळी त्यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिल्या.

मोहोळ सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौर्‍यात मुख्यत्वे बूथ सक्षमीकरण, धन्यवाद मोदीजी अभियानांतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच नुकताच पार पडलेला महाकाल लोकार्पण सोहळा नियोजन आणि अंमलबजावणी याचा देखील आढावा घेण्यात आला. आगामी काळातील केंद्रीय अभियान योजना आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्या चक्रीय दौऱ्याची रूपरेषा मांडून मोहोळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Advertisements

यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, “भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे वेगळेपण हेच आहे की, येथे सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते. त्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळते. माझी महाविद्यालयीन जीवनातील पहिली निवडणूक मी कोल्हापूर मधूनच लढलोय. त्यामुळे माझ्या राजकीय वाटचालीची सुरुवात कोल्हापूरमधून झाली असं म्हणता येईल. येत्याकाळात कोल्हापूर महापालिकेत भाजपची सत्ता खेचून आणल्याशिवाय कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसू नये. या क्षणापासून कामाला लागा.”

मोहोळ पुढे म्हणाले, “आगामी निवडणुका समोर ठेवून आपल्या सर्वांना बूथ सक्षमीकरणावर काम करायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने ठरवून दिलेल्या नियोजनानुसार आपापल्या भागातील बूथवर काम करायचे आहे. तसेच धन्यवाद मोदीजी हे अभियान राबवताना प्रत्येकाने आपापल्या भागातील विविध योजनांतील लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यावरही काम करायचे आहे.” त्यासाठी मोहोळ यांनी लाभार्थी संपर्क मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या. 

यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितराजे घाटगे, खासदार धनंजय महाडिक,शहराध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर,विभाग संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार अमल महाडिक, महिला मोर्चा अध्यक्षा शौमिका महाडिक,हिंदूराव शेळके, महेश जाधव,सत्यजित कदम, सरचिटणीस विठ्ठल पाटील, नाथाजी पाटील,अशोक देसाई, विजय जाधव, विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *