पाणीप्रश्नी भाजपचा हल्लाबोल : आयुक्त कार्यालयात दोन तास ठिय्या….!

ोल्हापूर : सातत्याने अडचणीच्या फेऱ्यात सापडलेल्या आणि कोल्हापूरकरांच्या दैनंदिन अडचणीचे कारण ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागाबद्दल चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रशासनाने असहकार्याची भूमिका घेतल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ‘जोवर प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोवर इथून जाणार नाही’अशी भूमिका घेऊन दोन तास ठिय्या मारला. शेवटी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे देऊ आणि लवकरात लवकर पाणी प्रश्नांची श्वेतपत्रिका काढून शहराची पाणी परिषद भरवू अशी ग्वाही प्रशासकांनी दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालय सोडले.
कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच पंपिंग स्टेशन मधील पंपांची व अन्य साधनांची परिस्थिती विदारक झालेली आहे. काल भाजपा पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी शिंगणापूर पंपिंग स्टेशनला भेट दिली असता ही परिस्थिती दिसल्यामुळे त्यांनी आज आयुक्तांबरोबर बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, दिलीप मैत्रिणी, सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी व माजी नगरसेवक यांचे शिष्यमंडळ प्रशासक कार्यालयात बैठकीसाठी आले. सुरुवातीला शिंगणापूरचे तीन पंप दुरुस्त करण्याचा डिसेंबर २०२१ मध्ये दिलेल्या प्रस्तावाची फाईल पहावयास द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावर अधिकारी कोणतेही संयुक्तिक उत्तर देईनात आणि फाईल दाखवण्यास टाळाटाळ केली यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी जोपर्यंत फाईल दाखवत नाही तोवर इथून जाणार नाही, फाईल नाही असे सांगा आम्ही पोलीस कंम्पलेंट करू असे प्रशासकांना ठणकावले. सुमारे तासभर या एकाच विषयावर अधिकारी व कार्यकर्ते यांच्यात वादावादी होत होती. पण शेवटी प्रशासक समोर असून देखील फाईल दाखवली गेली नाही याचे गौडबंगाल काय हा प्रश्न अनुत्तरीच राहिला.


त्यानंतर ‘आम्हाला पुढचे विषय मांडायचे आहेत आणि आपला वेळही वाया जाऊ द्यायचा नाही तुम्ही फाईल दाखवत नाही त्याबद्दल तुमचा निषेध’ असे राहुल चिकोडे यांनी प्रशासकांना सांगितले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडे मंजूर पदे, रिक्त पदे, एकूण उपसा होणारे पाणी व बिलिंग होणारे पाणी, काही वर्षांपूर्वी एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दृष्टोत्पत्तीस आलेल्या मोठ्या गळत्या आणि ए बी वॉर्ड मध्ये काम करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याचा भ्रष्टाचार, धोत्री गल्ली येथे दोन वर्षे येणारे मैला व आळ्या मिश्रित पाणी इत्यादी मुद्दे अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, संदीप कुंभार, प्रकाश घाटगे, विजय आगरवाल यांनी मांडले. तसेच संजय सावंत, प्रदीप उलपे चंद्रकांत घाडगे मंगल निपाणीकर यांनी जल अभियंता व प्रभारी सहाय्यक अभियंता यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. कोणीही अधिकारी एकाही प्रश्नाला समर्पक असे उत्तर देऊ शकले नाहीत.
सरते शेवटी राहुल चिकोडे यांनी या सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे द्या, पाणीपुरवठा विभागाकडील रॉ वॉटर पंपिंग स्टेशन मधील सर्व पंप बदलून नवीन पंप बसवण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करा. गेल्या पंधरा वर्षात पाणीपुरवठा म्हणून झालेल्या सर्व बाबींची श्वेतपत्रिका काढा आणि याबाबत सामान्य जनतेला माहिती होण्यासाठी लवकरात लवकर शहराची पाणी परिषद घ्या अशा मागण्या केल्या. प्रशासकांनी या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करून सर्व प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली व त्यानंतर बैठक संपली.
यावेळी उपाध्यक्ष राजू मोरे, सचिन तोडकर, डॉ.सदानंद राजवर्धन, आशिष कपडेकर, प्रीतम यादव, सचिन सुतार, प्रवीणचंद्र शिंदे, महेश यादव, सुजाता पाटील, सिद्धेश्वर पिसे, ओंकार गोसावी, ओंकार खराडे ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *