“ संवेदनशील समाज निर्मितीमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे भरीव योगदान :मा. अदृश्य काडसिध्देश्वर महाराज, मठाधिपती, कणेरी..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रतिभा आणि प्रयोग असल्यास उत्तम शिक्षक बनता येते. शरीराला श्रमाकडे व मनाला बुध्दीकडे नेणारे शिक्षण हवे. शिक्षणातून समाजाप्रती संवेदनशीलता जपली पाहिजे. देशात शिक्षण क्षेत्रात झपाटयाने बदल होत आहे. त्यामुळे कालानुरुप बदलून दर्शनशास्त्राच्या अध्ययनाला आणि नीती मूल्यांच्या जपणूकीला महत्व द्यायला आपण सर्व साधनं आहोत, आपल्या आंतरिक शक्ती ओळखा, जीवनात यशस्वी होणेसाठी क्रियाशील असणे गरजेचे आहे. प्रत्येकांमध्ये राष्ट्र, समाज व आईवडिलांप्रती कृतज्ञता असायला हवी. आदर्श शिक्षक कसा असावा याचा वस्तुपाठ शिक्षणमहर्षी डॉ. बापूजींच्या तत्वज्ञानातून, कार्यातून आणि विचारातून प्रतीत होतो, असे उद्गार कणेरी मठाचे मठाधिपती मा. अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांनी व्यक्त केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभाच्या निमित्ताने ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे होते. 

आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, समाजसुधाकांनी समाजामध्ये जी मूल्ये रुजविली त्या मूल्यांना आदर्श ठेवून समाजामध्ये जबाबदार नागरिक घडविण्यासाठी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, “ ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” या उदात हेतूने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यामुळे या संस्थेतून तयार झालेले विद्यार्थी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात उच्च पदापर्यंत कार्यरत आहेत. बापूजी ध्येयवादी शिक्षक होते. त्यांच्या कार्याचे योगदान शिक्षणक्षेत्रात सुवर्णाक्षरानी लिहिले जावे असे आहे. असे प्रतिपादन केले.

Advertisements

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आपल्या मनोगतात आजच्या युगात कौशल्याधारित शिक्षणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे सचिव मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यानी जन्मशताब्दी समितीच्या अहवालाचे वाचन केले. याचबरोबर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने बापूजींना पद्म पुरस्काराने सन्मानित करावे अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सव स्मरणिका, सौ. अर्चना पानारी यांचा परिसस्पर्श, प्रा.डॉ.विनोदकुमार वायचळ यांनी हिंदीत अनुवादित केलेला शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे (व्यक्तित्व एवं कार्य) आणि प्रा.डॉ. मच्छिंद्र नांगरे यांचा डॉ. बापूजी साळुंखे आणि मराठवाडा या ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेतील एकूण नऊ शाळांना सर्वोत्कृष्ठ शाखा व स्वच्छ सुंदर गुणवत्तेची शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

या समारंभाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील , शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि आप्पासाहेब पवार यांच्या पुतळयांना विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमापूजन व संस्था प्रार्थनेने झाली. यावेळी प्रा.महेश हिरेमठ यांनी भक्तीगीते सादर केली. संस्थेतील दिवंगत गुरुदेव कार्यकर्त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

शाहीर आझाद नायकवडी यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनावर आधारित स्वरचित पोवाडा सादर केला. आभार संस्थेच्या सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. शुभदा हिरेमठ व प्रा.महेश गायकवाड यांनी केले. यावेळी संस्थेचे सहसचिव (अर्थ) मा. एस. एम. गवळी, संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व संस्थेच्या १४ जिल्हयातील ४०६ शाखांमधून बहुसंख्य गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *