खाजगी पाणी पुरवठा टँकर धारकांचे पाणी पुरवठयाचे दर निश्चित…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि १५ : महापूर कालावधीमध्ये कोल्हापूर शहरास पाणी पुरवठा करणारी उपसा केंद्रे पुराच्या पाण्यामध्ये बुडण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत शहरास होणारा दैनंदिन पाणी पुरवठा काही भागांत खंडीत होतो. या दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून महापालिकेचे टँकर व भाडे तत्वावरील खाजगी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. असे असतानाही काही नागरीक खाजगी टँकरमार्फत पैसे भरुन टँकरची मागणी करतात. परंतु यावेळी पाण्याची गरज लक्षात घेता खाजगी टँकरधारक जादा दराने नागरीकांकडून पाण्यासाठी पैसे आकारत असल्याचे मागील वर्षी निदर्शनास आले होते. सध्या पंचगंगेची पाण्याची पातळी वाढत आहे. उपसा केंद्राच्या येथेही पाणी आले आहे. महापूर येऊन पाणी उपसा केंद्रे बंद पडण्याचा धोका आहे.अशी स्थिती निर्माण झाल्यास नागरीकांना योग्य दराने पाणी टँकर मिळावेत या उददेशाने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे पाटील यांच्याकडे दर निश्चितीबाबत पाठपूरावा केला. या सर्वांनी रिझनल ट्रान्सपोर्ट अर्थोरेटी यांच्याकडून पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचे दर त्यांच्या क्षमतेनुसार निश्चित करुन दिलेले आहेत. यामध्ये पाण्याचा ३ हजार लिटरचा १ टँकर ७०० रुपये, ९ हजार लिटरला १ टँकर ८५० रुपये, १२ हजार लिटरला १२०० रुपये असे दर दिलेले आहेत. तरी शहरातील नागरीकांनी उपसा केंद्रे बंद झाल्यास शहरातील पाणी पुरवठा खंडीत झाल्यास जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेल्या दराप्रमाणे खाजगी टँकर खरेदी करावेत असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *