वाढीव वीज बिलाबाबत सुधार समिती कार्यकर्त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना विचारला जाब

 

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : लॉकडाऊन काळात वीज वितरण कंपनी कडून वीजग्राहकांना आकारण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला.तसेच लॉकडाऊन काळातील ५०० युनिटपर्यंत सर्वसाधारण दर आकारण्याची तसेच वीज बिल भरण्यास ग्राहकांना सवलत देण्याची त्यांनी मागणी केली.

 

    यावेळी अधिकाऱ्यांनी समिती कार्यकर्त्यांना थेट नोटीस फलक घेऊन माहिती देण्याचा प्रयत्न केला.

Advertisements

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यासह देशात २२ मार्च पासून तीन महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. अजूनही काही प्रमाणात शिथिलता देत लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरूच आहे.   वीज वितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळात म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात ग्राहकांचे मिटर रिडींग घेतले नाही. सरासरी वीज वापरावर वीज बिल पाठवले आहे. ही वीजबिले लॉकडाऊन पूर्वीच्या बिलापेक्षा अधिक असल्याने, ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

अगोदरच लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे.  त्यात वीज वितरण कंपनीच्या या बिलामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.  म्हणून मंगळवारी मिरज शहर सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी, अध्यक्ष संतोष माने, उपाध्यक्ष जावेद पटेल, शंकर परदेशी, मुस्तफा बुजरूक, सुधीर गोखले, असिफ निपाणीकर, पिंटू पाटसकर, बाळासाहेब पाटील आदी सदस्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव वीजबिलाबाबत विचारणा केली.

यावेळी अधिकाऱ्यांनी थेट नोटीस फलक घेऊन कार्यकर्त्यांना आकारण्यात आलेल्या बिलाबाबत माहिती दिली, मात्र यावर कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. कंपनीने ५०० युनिट पर्यंत सर्वसाधारण दर म्हणजे ३ रुपये ४५ पैसे दर आकारावे व ग्राहकांना विज बिल भरण्यास सवलत द्यावी, तसेच डिसेंबरअखेर कोणत्याही थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज कनेक्शन तोडू नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *