राजकीय भूकंप Live Updates : शिवसेनेच्या भूमिके नंतर आमची भूमिका स्पष्ट करू : शरद पवार

Media Control Online 

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि संकटमोचक शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेविरोधातील बंड शमण्याच्या स्थितीत आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Advertisements

शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. एकनाथ शिंदे हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह सूरतला जाऊन बसले आहेत. तसेच आपल्यासोबत शिवसेनेतील ३५ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा शिंदे गटाकडून खासगीत केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यास ठाकरे सरकार पडणार, हे जवळपास अटळ आहे. या पार्श्वभूमीवर, तुम्ही हे सरकार वाचवू शकता का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, २०१९ साली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाले तेव्हादेखील आमच्या पक्षाच्या काही आमदारांना उचलून हरियाणात आणण्यात आले होते. पण नंतर ते तिथून निघून आले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि गेली अडीच वर्षे ते कार्यरत आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीमधूनही काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचं नेतृत्व जे ठरवेल, त्यासोबत आम्ही असू, पण मला पूर्ण विश्वास आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चांगलं सरकार चाललंय, त्यात कुठल्याही बदलाची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *