२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; विकासकामांना गती देणाऱ्या उपक्रमाची कृष्णराज महाडिकांकडून पाहणी

Media control news network

कोल्हापूर, प्रतिनिधी/ धार्मिक, पर्यटन आणि सांस्कृतिक ओळख जपणाऱ्या कोल्हापूर शहरात महिलांसाठी मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर होता. विशेषतः अंबाबाई मंदिर, ज्योतिबा, पन्हाळा या ठिकाणी येणाऱ्या महिला भाविक आणि पर्यटकांना सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. अखेर या दीर्घकालीन प्रश्नावर ठोस पाऊल उचलत शहरातील खासबाग मैदान चौक आणि ताराबाई पार्क परिसरात आधुनिक, वातानुकूलित आणि सर्व सुविधांनी सुसज्ज महिला स्वच्छतागृहांची उभारणी पूर्ण झाली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा रविवारी १० मे रोजी होणार आहे.

Advertisements

या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष स्थळी जाऊन कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणांकडून सुविधांची माहिती घेत गुणवत्ता आणि देखभालीबाबतही सूचना दिल्या.

कोल्हापूर हे राज्यातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटन केंद्र असल्याने येथे दररोज हजारो भाविक आणि पर्यटक दाखल होत असतात. मात्र महिलांसाठी सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता ही शहराच्या प्रतिमेला बाधा आणणारी बाब ठरत होती. महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर या विषयाला पुन्हा प्राधान्य मिळाले. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या समन्वयातून कृष्णराज महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला आणि या प्रकल्पाला गती मिळाली.

विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांत ही कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. महिलांच्या सुरक्षितता, स्वच्छता आणि सन्मानाचा विचार करून उभारण्यात आलेल्या या स्वच्छतागृहांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागरी विकासाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, शहरातील सार्वजनिक सुविधांच्या उन्नतीकडे प्रशासन गंभीरपणे वाटचाल करत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

रविवारी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

खासबाग मैदान येथे सकाळी साडेनऊ वाजता तर ताराबाई पार्क परिसरातील आरटीओ कार्यालयाजवळ सकाळी साडेदहा वाजता लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून उभारण्यात आलेल्या या सुविधा भविष्यात कोल्हापूरच्या नागरी विकास मॉडेलसाठी दिशादर्शक ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *