बाराव्या शतकापासून सुरु झालेली राज दरबारातील मोडी लिपी पुन्हा एकदा मोडीची वाढतेय गोडी

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:6 Minute, 5 Second

  विशेष वृत्त.. प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर

     मोडीत निघालेल्या मोडीची वाढतेय गोडी

बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत ऑनलाईन मोडी शिकण्याकडे आणि शिकवण्याकडे कल वाढल्याचेही दिसून येत आहे.

महाराष्ट्रात सुमारे १२ व्या शतकापासून मोडी लिपीची सुरूवात झाली असे इतिहासकारांचे मत आहे. श्री. हेमाद्रीपंथ ते या लिपीचे जनक होते. न मोडता, न थांबता अत्यंत जलद गतीने लफ्फेदारपणे झरझर लिहील्या जाणाऱ्या लिपीस मोडी असे म्हणतात. यादव काळापासून सुरू झालेला हा प्रवास शिवकाळात बहरला होता.

या लिपीचा सर्रास वापर राजदरबाराबरोबरच लोकांच्या दैनंदिन जीवनात २० व्या शतकाच्या अखेरपर्यंत होत असे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळात १९६० पर्यंत तिचा समावेश शिक्षणात होता. परंतु, छपाईच्या दृष्टिने तिची मर्यादा लक्षात घेवून काळाच्या ओघात ही मोडी लिपी मोडीत निघाली.

मोडी लिपीचा प्रसार आणि प्रचार शिवकाळात झाला. आजही शिवकाळातील व पेशवाई काळातील कागदपत्रे पाहिली तर बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच असल्याचे दिसून येते. आजही खासगी संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालये विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालये, तहसिलदार कार्यालये, भूमीअभिलेख कार्यालये, नगरपालिका या ठिकाणी जुने दस्ताऐवज मोडी लिपीत आहेत. जन्म-मृत्यूची नोंद, जमिनींची कागदपत्रे यांचा समावेश यात आहे. अभिलेखागारातील या कागदपत्रांचे वाचन व्हावे, इतिहास संशोधनास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा उपक्रम हाती घेतला. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते याचा ३ डिसेंबर २००३ रोजी शुभारंभ झाला.

 

पुराभिलेख विभागाचे अभिलेखपाल गणेश खोडके यांनी याबाबत माहिती दिली. राज्य शासनाच्या पुराभिलेख संचालनालया – च्यावतीने मोडीचे प्रशिक्षण देण्यात येत असते. १० दिवसांच्या या प्रशिक्षणानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा होते. उत्तीर्ण होण्यासाठी कमीत-कमी ५० गुणांची आवश्यकता असून, उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही देण्यात येते. याबाबत कोल्हापूरमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये प्रशिक्षण घेण्यात आले. मर्यादित प्रवेश असतानाही या प्रशिक्षणासाठी मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुणे येथील सी डॅकच्यावतीने ‘मोडी लिपी शिका’ हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत पध्दतीने माहिती दिली आहे. कोल्हापुरातील आदित्य माने या मोडी लिपी प्रेमी विद्यार्थ्याने इयत्ता ८ वी पासून स्वत: मोडी लिपीची गोडी लावून घेतली. शिवाजी विद्यापीठामधील तसेच पुराभिलेख विभागाची मोडी लिपी प्रशिक्षण पूर्ण केले.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आदित्यने ऑनलाईन प्राथमिक मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग घेतला होता. त्याचबरोबर शासनाच्या विविध कार्यालयात आवश्यकतेनुसार कागदपत्रांच्या वाचनासाठीही जात असतो. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आदित्यने लिहीलेल्या ‘प्रशिक्षण मोडी लिपीचे’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले आहे. केवळ प्रशिक्षण देवून न थांबता आदित्यने वीर शिवा काशिद पुण्य दिनानिमित्त ऑनलाईन सुंदर मोडी लिपी हस्ताक्षर स्पर्धेचेही आयोजन केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात यु ट्युबच्या माध्यमातून अनेकजणांनी आपले छंद जोपासण्याचा विविध प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मोडी शिकणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मोडीत निघालेल्या मोडीची पुन्हा एकदा गोडी निर्माण झाली आहे हे यावरून दिसून येते.

 

 

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *